सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या एका उत्तरामुळे मकरंद पाटील यांची चांगलीच पंचाईत झाली. “अजित पवार राष्ट्रवादीत समाधानी नसल्यामुळेच मकरंद आबांना घेऊन महायुतीत आल्याचे देसाई यांनी सांगताना शेजारी बसलेल्या मकरंद आबांना ‘होय ना आबा?’ असे विचारताच आ. पाटील यांची मात्र अडचण झाली. एकेकाळी खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ असलेल्या आबांना हो म्हणावे तरी पंचाईत अन् नाही म्हटले, तरी पंचाईत अशी स्थिती झाली.
सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर महायुतीत अन्याय होत असल्याचे विधान केले होते. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, सुप्रियाताईंचे विधान चुकीचे आहे. उलट राष्ट्रवादीतच त्यांच्यावर अन्याय होत होता. त्यामुळेच अजित पवार हे महायुतीत आले आहेत. अजित पवार समाधानी नव्हते, म्हणून ते मकरंद पाटील यांच्यासमवेत आमच्यासोबत आले.
साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून लाडकी बहीण बॅनरमधून अजित पवार यांचा फोटो वगळला असल्याबाबतही देसाई यांनी हा भाजपशी संबंधित प्रश्न असून, उत्तर देणे टाळले तर एकनाथ खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादीत असून भाजपात प्रवेश झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. याबाबतही हा प्रश्न राष्ट्रवादी आमदारांना विचारावा, असे देसाई यांनी म्हंटले.