महाबळेश्वरात होणार 3 दिवसाचा महाराष्ट्र पर्यटन महोत्सव; मंत्री शंभूराज देसाईंनी घेतली आढावा बैठक

0
241

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र पर्यटन महोत्सव (Maharashtra Tourism Festival) एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव राज्यातील तसेच देशातील पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरणार असून अनेक सांस्कृतिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा यात समावेश असणार आहे. या महोत्सवादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे दिवसनिहाय वेळापत्रक तयार करावे, त्याचप्रमाणे हे कार्यक्रम महाबळेश्वरमधील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर आयोजित करावेत, अशा सूचना राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पर्यटन विभागातर्फे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आज मंत्रालयातील दालनात पर्यटन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा सादरीकरणाद्वारे याप्रसंगी घेतला. तसेच त्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटील, पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here