महाबळेश्वरची पर्यटन विभागाची जागा तत्काळ विकसित करा!; आढावा बैठकीत पर्यटनमंत्री देसाईंचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुंबईत मंत्रालयातील दालनात शुक्रवारी राज्याचे पर्यटन व खनीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकास महामंडळाच्या जागे संदर्भात सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून तात्काळ विकसित करण्याचे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, संचालक बी. एन. पाटील तसेच दूरदृश्य कार्य प्रणालीवरून सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील व सर्वप्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, महाबळेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची १५ एकर जागा आहे. ही जागा विकसित करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून मंजुरी मिळाली आहे. मात्र काही किरकोळ कारणांमुळे काम सुरू झालेले नाही. सर्व कागदपत्रे नियमित आहेत. त्यामुळे हे प्रलंबित काम तत्काळ सुरू करावे.

महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या ‘महाराष्ट्राचा महा फेस्टिवल’चा घेतला आढावा

महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल” चे आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवाच्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी मंत्रालयातील दालनात आढावा घेतला. पर्यटनवाढीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाबळेश्वर मधील ‘महा फेस्टिवल’साठी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांच्या जबाबदाऱ्यांविषयी मंत्री श्री. देसाई यांनी माहिती जाणून घेतली. तसेच फेस्टिवल दरम्यान पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, स्वच्छता, वाहतुकीचे नियोजन, येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेवर जास्त लक्ष ठेवण्यासंदर्भात सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या महोत्सवाच्या कामांसाठी जिल्हा आणि स्थानिक स्तरावर नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.