कराड प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून राज्यात सरकारमध्ये खाते वाटपाबाबत सुरु असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाले. नव्या शिंदे-पवार-फडणवीस सरकारचे नुकतेच खातेवाटप जाहीर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान खातेवाटपापूर्वी सातारा जिल्ह्यातील पालकमंत्रिपद व आमदार शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरु होती. मात्र, या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांच्याकडे असणारे राज्य उत्पादन शुल्क मंत्रिपदाचे खाते ‘जैसे थे’ असेच ठेवण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार शरद पवार यांच्या गटातून अजित पवार गटात दाखल झालेल्या आमदार मकरंद पाटील यांना कोणतंही खात देण्यात आलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे.
सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात अनेक सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे गटाकडून केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी करत अजित पवारांनी पक्षातील आमदारांना घेऊन भाजप-शिंदे गटाशी एकी केली. यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्यापैकी आमदार मकरंद पाटील, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हे अजित पवार गटात सामील झाले.
आता सातारा जिल्ह्यात खासदार शरद पवार गटाचे केवळ दोनच आमदार उरले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पद शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मात्र, काही सांगता येत नसल्याची चर्चा होत आहे.