सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत महाबळेश्वर येथे एप्रिल मध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव दिव्य भव्य असणार असून देशातून तसेच महाराष्ट्रातून पर्यटक येणार आहेत. सर्व विभागांनी समन्वयातून हा महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महोत्सव काळात येणाऱ्या पर्यटकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महोत्सव हा तीन दिवसांचा असणार आहे. या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वर येथे येतील यासाठी आत्तापासून पार्कीग व वाहनांची कोंडी होणार नाही यासाठी आराखडा तयार करावा. तसेच वाहन पार्कींगसाठी जागा शोधण्याचे काम करावे.
पर्यटन महोत्सव कालावधीत हेलीकॉप्टर सफर ठेवण्यात येणार आहे. यासाठी दोन हेलीपॅड तयार करावे. यासाठी जागा बघुन ठेवा. महोत्सव कालावधीत ज्यादा विद्युत पुरवठा लागणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत होवू नये यासाठी विद्युत वितरण कंपनीने दक्ष रहावे तसेच जनरेटरचीही व्यवस्था करावी. महाबळेश्वर येथील रस्त्यांची कामे हातात घ्यावी. तसेच विविध उद्यांने चांगल्या पद्धतीने ठेवावीत. पाचगणी व महाबळेश्वर या कालावधीत स्वच्छ असले पाहिजे यासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचना करुन महाबळेश्वर येथे होणारा पर्यटन महोत्सव यशस्वीरित्या आयोजन करुया, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.