कराड प्रतिनिधी | पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी कराड येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. कॉंग्रेसचे जे दहा-बारा आमदार निवडुन आले त्यात घोटाळा झाला नाही आणि महायुतीचे निवडुन आले त्यात घोटाळा झाला आहे असे काहीजण म्हणत आहेत. वास्तविक असे म्हणने चुकीचे आहे. निवडणुक आयोग ही स्वायत्त यंत्रणा असून पृथ्वीराज चव्हाण यांनी तसा आरोप केला असेल तर त्यासंदर्भात महायुतीचा आमदार म्हणुन त्यांनी समोरासमोर यावे आणि या विषयावर चर्चा करावी मी चर्चेसाठी तयार आहे, असे आव्हान देसाई यांनी चव्हाण यांना दिले.
कराड येथे शासकीय विश्रामगृहात मंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सुलोचना पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, माझ्या मतदार संघातील अनेक मतदार मुंबईवरुन आले. त्यांना यायला उशीर झाला. त्यामुळे मतदानासाठी वेळ लागला. रांगा असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे शेवटच्या तासात मतदानाची आकडेवारी वाढली म्हणजे ती बोगस आले हे म्हणने चुकीचे आहे.
यावेळी मंत्री देसाई यांनी कराड चिपळूण रेल्वे मार्गावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कराड-चिपळुण रेल्वेमार्गाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी हे महत्वाचा रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्या संदर्भात चर्चा करुन त्या रेल्वे मार्गासाठी आग्रह धरणार आहे.