सातारा प्रतिनिधी | जल जीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्व कामे दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण होतील, याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, व योग्य नियोजन करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सातारा जिल्ह्यातील कामांचा आढावा बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गौरव चक्के, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा पल्लवी चौगुले, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विजय वाईकर तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व उपअभियंता पाणीपुरवठा उपस्थित होते.
सदरील बैठकीत प्रगती पथावर असलेल्या कामांचा तालुका निहाय आढावा घेण्यात आला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या तसेच कामाचा योग्य दर्जा न राखणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले. जल जीवन मिशन – प्रत्येक घरास नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी या उपक्रमांतर्गत कोणीही वंचित राहणार नाही याकरिता सदर योजनांमध्ये काही फेरबदल, सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास सदर प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
000