सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरातील शाहूनगर व दरे खुर्द (ता. सातारा) येथे चोरट्यांनी घरफोडी करून खळबळ उडवून दिली. दोन्ही ठिकाणी झालेल्या चोर्यांमध्ये सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर व सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
ग्रीनसिटी, शाहूनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी अब्दुल इमाम सय्यद (वय 28) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीची घटना दि. 31 ऑगस्ट रोजी घडली आहे. चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून सोन्याचे गंठण, सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातल्या रिंगा, झुबे, सोन्याचे गोळे, चांदीचे ब्रेसलेट, छल्ला असा 2 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
दुसरी घटना दरे खुर्द (ता. सातारा) येथे घडली असून याप्रकरणी पूजा तानाजी साळुंखे (वय 28) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीची घटना दि. 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून घरातून सोन्याचे मणीमंगळसूत्र, सोन्याची अंगठी, पर्स असा एकूण 1 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.