अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शिवकाल!; शिवेंद्रराजेंची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जय भवानी.. जय शिवाजी असा जयघोष, हलगीचा कडकडाट अन् तुतारीच्या निनादात किल्ले अजिंक्यताऱ्यावर शुक्रवारी छत्रपती शाहू महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तथा सातारा स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

स्वाभिमान दिनानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेची शुक्रवारी सकाळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंगळाई देवीपर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवतांचे दर्शन घेऊन पालखी सोहळा राजसदरेवर विसावला.

यावेळी शिवभक्तांनी दिलेल्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. भगवे फेटे अन् भगव्या पोशाखातील मावळ्यांमुळे किल्ल्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली. राजमाता जिजाऊ यांचीदेखील जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहू महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीचा मान मुस्लिम बांधवांनादेखील देण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, प्रशांत आहेरराव, कन्हैय्यालाल राजपुरोहित, दत्ताजी भोसले, अमर जाधव, डॉ. संदीप मंहिद, अजय जाधवराव, रेणू येळगावकर, शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.