सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाकडून लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीयम येथील शिवकालीन ऐतिहासिक वाघनखे तीन वर्षांच्या करारावर भारतात आणली आहेत. सहा महिन्यांसाठी ही वाघनखे सातार्यातील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आली. सातार्यातील कालावधी पूर्ण झाल्याने ही वाघनखे नुकतीच नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली. वाघनखांसाठी बनवण्यात आलेल्या या स्वतंत्र दालनात आता नव्या ऐतिहासिक वस्तू प्रथमच पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. आता नुकतेच या ठिकाणी सातार्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा तसेच शिवकालीन एकेरी वाघनखे मांडण्यात आली आहेत.
साताऱ्यातील संग्रहालयाच्या कुपीत अडीच हजारांहून अधिक ऐतिहासिक वस्तू आहेत. या वस्तूंचे संग्रहालय व्यवस्थापनपणाकडून उत्तम पद्धतीने संवर्धन करण्यात आले आहे. यापैकी ऐतिहासिक महत्त्व लाभलेली शिवकालीन एकधारी व पाचधारी वाघनखे, राजधानी सातार्याचे संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा चांदीची मूठ असलेला बिचवा, कोल्हापूर संग्रहालयातून प्राप्त झालेल्या 1682 सालच्या दोन पंचधातूच्या तोफा या दालनात ठेवण्यात आल्या आहेत.
नागरिकांना या ऐतिहासिक वस्तूंसह सातार्याचे तक्त, शस्त्र, नाणी दालन, मुद्रा विविध प्रकारच्या पेंटिंग अशा सुमारे 2 हजार 500 वस्तू पाहता येणार आहेत. या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले आहे.