पुसेगावात सेवागिरी यात्रा जागा वाटपास सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दि. ६ ते १६ जानेवारी दरम्यान यात्रा प्रदर्शन आयोजित केले आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने येणाऱ्या व्यावसायिकांना यात्रास्थळ व पुसेगाव-दहिवडी रस्त्याच्या दुतर्फा ट्रस्टच्या वतीने जागा उपलब्ध करून दिल्या जातात. या जागा वाटपाचा प्रारंभ देवस्थानचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने, ट्रस्टचे माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मठाधिपती प. पू.सुंदरगिरी महाराज म्हणाले, “श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत लाखो भाविक देवदर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी येतात. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविक, यात्रेकरू व व्यावसायिकांना शुद्ध पाणी पुरवठा, आरोग्य, वीज, स्वच्छता यासह सर्व सोयी-सुविधा श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन नियोजनबद्ध पुरवीत असते.

दरम्यान, व्यावसायिकांना अनामत रक्कम भरल्याशिवाय दुकानासाठी जागा दिली जाणार नाही. आजपासून ट्रस्टच्या कार्यालयात बुकिंग करणे बंधनकारक आहे. त्यानंतर तीन जानेवारीला सातारा-पंढरपूर रोडच्या उत्तरेकडील बाजूस, चार जानेवारीला सातारा-पंढरपूर रोडच्या दक्षिणेकडील बाजूस, तर दि. ५ जानेवारीला यात्रा स्थळावरील पाळण्याच्या परिसरात अनामत रक्कम भरलेल्या व्यावसायिकांना दुकाने उभी करण्यासाठी ट्रस्ट जागा वाटप करणार आहे.