कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काले गावचे ज्येष्ठ नेते भीमरावदादा धोंडी पाटील यांचे वयाच्या 92 वर्षी आज बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांच्या निधनाने काले गावसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांनी सातारा जिल्हा परिषद कृषि सभापती, कराड पंचायत समिती सभापती, शेती उत्पन्न बाजार समिती अशा विविध पदावर काम केले. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. आज सकाळी 9 वाजता त्याचं पार्थिव बाजारपेठ काले येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ हे ज्येष्ठ नेते भीमरावदादां पाटील यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. कराड तालुक्यातील काले पंचक्रोशीत दादांचा शब्द प्रमाण मानला जाईल. अतिशय परखड आणि स्पष्टवक्ते म्हणून तालुक्याच्या राजकारणात त्यांची ओळख होती. काले जिल्हा परिषद मतदार संघावर त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवले होते. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
भीमरावदादांचा असा आहे राजकीय प्रवास
कराड तालुक्यातील काले गावचे सरपंच म्हणून भीमरावदादा पाटील यांनी 1962 ते 1967 या काळात राजकीय क्षेत्रास सुरुवात केली. त्यानंतर 1967 ते 1972 या काळात कराड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून भीमराव दादा यांनी उत्तमपणे काम पाहिले. 1972 ते 1977 काळात भीमराव दादा यांनी पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे हातात घेतली. या काळात कराड पंचायत समितीमध्ये त्यांनी अनेक बदल केले. 1977 ते 1979 आणि 2005 ते 2008 असे दोनवेळा भीमरावदादा यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. या शिवाय कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून भीमरावदादा यांनी काम पाहिले. 1980 ची विधानसभा निवडणुकही भीमरावदादांनी लढवली होती. त्यांना राज्य शासनाकडून दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे वाहिली श्रद्धांजली
भाजप आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांच्या हस्ते निधनानंतर फेसबुक पोस्ट करीत श्रद्धांजली वाहिली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादांनी जिल्हा परिषद, बाजार समिती, पंचायत समितीच्या माध्यमातून उत्तम काम केलं. आज दादांच्या जाण्यानं आम्ही सर्वांनी एक जेष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व गमावलं याचं दुःख आहे. मी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे.