सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे काम प्रगतीपथावर असून, या संग्रहालयाचा मुख्य प्रवेशद्वाराला ऐतिहासिक बांध असलेला महाकाय दरवाजा बसवण्यात आला आहे. हा दरवाजा पोलाद आणि बिडाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या दरवाज्याचे वजन तब्बल अडीच टन इतके आहे.
सातारा जिल्हा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा असून पूर्वी मराठा राज्याची राजधानी म्हणून ओळखला जायचा. इथे सन १८३९ सालापर्यंत छ.शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यानी राज्य केले. प्रामुख्याने येथील संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने लोकांना प्रेरणादायी वाटतात.सन १९६६ साली या संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व सन १९७० साली त्याचे काम पूर्ण झाले.या संग्रहालयाचे उदघाटन श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोंसले यांच्या शुभाशीर्वादाने व तत्कालीन गृहमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पार पडला.
या ठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक पुरातन वस्तुंचा संग्रह आहे. हे वस्तु संग्रहालय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. या संग्रहालयात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींनी वापरलेल्या वस्तु, साधने, शस्त्रे आणि पोशाखांचा संग्रह आहे.
येथे भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते,तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशु, गुप्ती, धनुष्यबाण, किल्ल्याचा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीकडून वापरावयाचेशस्त्र, सोनसळी,पडदे, गुप्तीचे प्रकार, रणशिग, जेडची मठ, बिचवा, पालखीच्या दांड्यावरील मानचिन्ह, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारुच्या पुड्याचा शिगाडा, संगीनी, पिस्तुले इ. विविध प्रकारची युध्द साहित्य व साधने येथे मांडलेली आहेत. वस्त्र विभागामध्ये अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, साडया, पैठणी, फेटे, बख्तर,बाहू, आच्छादने, तुमान अनेक प्रकारच्या पगड्या, शेला, इ. समावेश होतो. या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे.