सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू असताना स्थानिकांना डावलून परस्पर तीन सुरक्षारक्षक नेमल्याने प्रतापगड व वाडा कुंभरोशी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा येथील पंचायत समितीमध्ये निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची देखरेख करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सातारा व सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सातारा यांच्या माध्यमातून तीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रतापगड, कुंभरोशी यांना करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसभेद्वारे इच्छुकांची नावे घेण्यात आली होती. या इच्छुक उमेदवारांची कुंभरोशी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या समोर कागदपत्रांची पडताळणी करून, शारीरिक चाचणी घेऊन, आरोग्य तपासणी पात्रता मागवून, मुलाखत घेण्यात आली होती व सर्व आवश्यक पडताळणी करण्यात आली होती.
अशी प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे या जागांसाठी तीन सुरक्षारक्षक नियुक्त केल्याचे नागरिकांना आढळून आले. अशा प्रकारे स्थानिकांना डावलून या नियुक्त्या केल्याने प्रतापगड व कुंभरोशीमधील स्थानिक ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे.
गुरुवारी प्रतापगड प्राधिकरण विशेष निमंत्रित सदस्य व शिवसेना महाबळेश्वर शहर अध्यक्ष विजय नायडू, भाजप कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सनी मोरे, भाजप महाबळेश्वर शहर प्रभारी राजेंद्र पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष विनय गायकवाड, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल लांगी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ऋषी सपकाळ, सचिव आविष्कार केळगणे, मंगेश नाविलकर, विनोद दळवी, तेजस मोरे, प्रणय सुतार व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन पंचायत समिती येथे शिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे केलेल्या नियुक्त्या तत्काळ रद्द करून ग्रामपंचायत स्तरावरील निश्चित केलेले उमेदवार नियुक्त केले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.