कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील धोंडेवाडी फाटा येथे डंपरमधील ग्रीट उतरत असताना डंपरचा हौदा उलटल्याने त्याखाली सापडून सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, सुरक्षा रक्षकाचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे.
देवानंद मारुती पाटील (वय ४८, रा. काले, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की धोंडेवाडी फाटा येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या ग्रीटचा साठा करण्यात येतो. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चालक मोहम्मद इमामुल कासीम अन्सारी (वय ५२, मूळ रा. झारखंड) हा डंपरमधून (एमएच ०९ जीजे ९९२८) ग्रीट घेऊन तेथे गेला.
त्यावेळी सुरक्षारक्षक देवानंद पाटील हे चालकाला साइड सांगत होते. चालक मोहम्मद अन्सारी याने डंपर पाठीमागे घेत असतानाच डंपरच्या हौद्यातील ग्रीड ओतण्यासाठी हौद्यातून डंपिंग केले. त्यावेळी डंपरचा पाठीमागील हौदा डाव्या बाजूस कोसळला. त्या हौद्याखाली सुरक्षारक्षक देवानंद पाटील हे सापडले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.
जेसीबीच्या साहाय्याने डंपरचा हौदा बाजूला काढून त्यातून देवानंद पाटील यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचाराठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालक मोहम्मद अन्सारी याच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.