साताऱ्यातील शिवतीर्थाची 850 किलो वजनाच्या दरवाजामुळे सुरक्षा व्यवस्था भक्कम

0
614
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संतोष गुरव

सातारा हे राजधानीचे शहर आहे. सातारा पालिकेच्या वतीने पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी शिवछत्रपतींची राजमुद्रा, जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची चित्रे तसेच तलवार व भालाधारी मावळ्यांचे पुतळे काही दिवसांपूर्वी उभे करण्यात आले आहेत. आता प्रवेशद्वाराला ऐतिहासिक बाज असलेले दोन दरवाजे देखील बसविण्यात आले असून यामध्ये एक लाकडी, तर दुसरा पोलादी आहे. लाकडी चौकटीसह या दरवाजाचे वजन ८५० किलो इतके आहे. या दरवाजामुळे शिवतीर्थावर 850 किलो दरवाजाची सुरक्षा व्यवस्था भक्कम झाली आहे.

मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनानुसार पालिका प्रशासनाने सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून या कामाची जबाबदारी ‘सोनाली कन्स्ट्रक्शन’ या संस्थेवर सोपविली. या संस्थेकडून अत्यंत आखीव-रेखीव पद्धतीने शिवतीर्थ व परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. या कामासाठी २० हजारांहून अधिक घडीव काळ्या दगडांचा वापर करण्यात आला. या दगडांच्या माध्यमातून येथे किल्ल्याप्रमाणे बुरुज, तटबंदी, मेघडंबरीही उभारण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात या दगडातून किल्ल्याप्रमाणे बुरुज, तटबंदी, मेघडंबरी उभारण्यात आल्याने या कामातून इतिहास झळकू लागला आहे. दुसऱ्या टप्प्यात दोन्ही प्रवेशद्वारांवर ऐतिहासिक बाज असलेले दोन दरवाजे बसविण्यात आले आहेत. या दरवाजांची किल्ल्यावरील रचनाही दरवाजांप्रमाणे आहे. लहान आकाराचा साताऱ्यातील दरवाजा विद्याधर कांबळी यांनी तयार केला असून, तो पोलादी आहे. या दरवाजाचे वजन साधारण ५०० किलो असून, त्यावर फिरत्या भिंगऱ्या, मोठी चक्रे, सिंहाच्या प्रतिकृती आहेत.

Satara 00

गडकिल्ल्यांच्या इतिहासाला चित्ररूपात उजाळा

शिवतीर्थाच्या अंतर्गत भागात छत्रपतींची राजमुद्रा, किल्ले अजिंक्यतारा, प्रतापगड, चार भिंती स्मारक, सज्जनगड, पुरातन मंदिरे या ऐतिहासिक वास्तूंसह कोयना धरण, सातारकरांची तहान भागविणारे कास धरण येथे चित्ररूपात मांडण्यात आले आहे. याशिवाय भाला व तलवारधारी मावळ्यांचे पुतळेही येथे उभे करण्यात आले आहेत. सुशोभीकरणाच्या या कामातून राजधानीच्या वैभवात भर पडली असून, शिवतीर्थाचे सौंदर्यही खुलून गेले आहे. त्यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे.

Satara News 01

असा आहे लाकडी दरवाजा

सातारा येथील पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे मुख्य प्रवेशद्वारे हे संपूर्ण सागवानी लाकडापासून तयार करण्यात आले आहे. याची उंची २.४ मीटर तर, तर रुंदी ३.७७ मीटर इतकी आहे. लाकडी चौकटीसह या दरवाजाचे वजन ८५० किलो इतके आहे. किल्ल्यावरील दरवाजांप्रमाणे या दरवाजावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. दरवाजावर ५८ पितळी चक्र बसविण्यात आली असून, तो पुणे येथे तयार करण्यात आला.