सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव या ठिकाणी दि.12 ते 29 जानेवारी या कालावधीत श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत कोणत्याही ठिकाणी पशुबळी दिला जाणार नाही. यासाठी पोलीस दल व प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. ढोल व वाद्यांच्या आवाजामुळे शेजारी काही अनुचीत प्रकार घडला तरी काही एकू येत नसल्याने मांढरदेवी येथील काळेश्वरी परिसरात महाद्वार ते मंदिर व परत महाद्वार पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यासही मनाई करण्यात आलेली आहे.
तसेच 12 ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी प्रदान केले आहेत.