सातारा प्रतिनिधी | बोरगाव, ता. सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठक (दि. 22) उत्साहात पार पडली. बैठकीत “आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकर्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंधारणावर भर द्यावा,” असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील प्रगतिशील व पुरस्कारविजेत्या शेतकर्यांचा डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. सी. एस. पाटील म्हणाले, पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून, उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या गत वर्षातील कार्याचा अहवाल सादर केला. या बैठकीस अटारी (पुणे) येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक, पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ, कराड कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक व कृषी अधिकारी बैठकीस उपस्थित होते