सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक द़ृष्टिकोन रुजावा याअनुषंगाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे असून जिल्ह्यातील 25 प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रयोग शाळेतून विविध प्रयोग केल्यानंतर विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाल्यास जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होण्यास मदत होणार आहेत.
प्रत्येक विद्यार्थी प्रयोगातून घटनेचा पडताळा घेण्यासाठी सक्षम व्हावा. या हेतूने प्रत्येक शाळेत विविध साधनांनी युक्त प्रयोगशाळा असायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण होण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिकासह शैक्षणिक अनुभव देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रयोगशाळा अत्यंत आवश्यक व महत्त्वाची ठरते. त्यानुसार सातारा जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 25 प्राथमिक शाळांमध्ये सुसज्ज अशा प्रयोगशाळा तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी 4 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक निधीमधून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील 25 शाळांमध्ये सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल शाळा, इंटरनेट, वाय फाय सुविधा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना प्रयोगामधील डेटांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देतात आणि त्यांना विविध प्रयोग करत शिकण्याचा अनुभव देतात. प्रयोगशाळा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी विज्ञान शिकवणे आणि शिकणे सोपे करते.
अनेक वैज्ञानिक संकल्पना केवळ पाठ्य पुस्तकातून स्पष्ट करणे कठीण आहे. परंतु प्रयोगशाळेतील मॉडेल्स, किटस आणि प्रयोग विद्यार्थ्यांना या संकल्पना अधिक चागंल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे उभारण्यात येणार्या प्राथमिक शाळांमध्ये बालवैज्ञानिक घडण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील ‘या’ शाळांमध्ये होणार प्रयोगशाळा…
कराड तालुक्यातील उंब्रज मुले, तुळसण, कोडोली. कोरेगाव तालुक्यातील जळगाव, कुमठे. माण तालुक्यातील लोधवडे, धुळदेव. महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड, राजपुरी, तापोळा. सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली, लिंब न.1, प्रतापसिंह हायस्कूल सातारा, फलटण तालुक्यातील तरडगाव, मठाचीवाडी. पाटण तालुक्यातील म्हावशी, नुने, वेखंडवाडी, मारूल हवेली, वाई तालुक्यातील पसरणी, कवठे. जावली तालुक्यातील बामणोली (कुडाळ). खटाव तालुक्यातील खटाव, खंडाळा तालुक्यातील नायगाव अशा मिळून 25 शाळांमध्ये प्रयोगशाळा होणार आहेत.