सातारा दि.२१ : शालेय जीवनातील अनेक प्रसंगांच्या एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल ३४ वर्षांनंतर रयत शिक्षण संस्थेच्या मेरु विद्यामंदिर वाघेश्वर या हायस्कूलमधील १९९० – १९९१ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध दरवळला. मेरू विद्यामंदिरच्या सभागृहामध्ये १९९१ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ३४ वर्षांनंतर म्हणजे वयाच्या पन्नाशीत मित्र-मैत्रिणींच्या भेटी झाल्या. एकाच बाकावर बसलेले आणि भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील हे सवंगडी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले.
विद्यार्थीदशेतील परिस्थिती, प्रसंग आठवत एकमेकांना नव्याने ओळख करून द्यावी लागत होती. पती, पत्नी, मुलंबाळं, नोकरी, व्यवसाय आदी विषयांवर गप्पा रंगल्या होत्या. ३४ वर्षानंतर प्रथमच एकमेकांना भेटत असलेल्या अन् पन्नाशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अश्रूंना आवरता आले नाही. यावेळी स्नेहभोजन, गीत-गायन, नृत्य, संगीतखुर्ची गाण्यांच्या भेंड्या विविध कलागुणांना वाट मोकळी करून या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ भेटीचा आनंदोत्सव स्नेह मेळाव्यातून उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी तत्कालीन गुरुजनवर्ग श्री डुबल सर, सावंत सर, घोरपडे सर, पाटील सर, यांच्यासह अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नामदेवराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान हायस्कूलच्या प्रतिनिधी म्हणून कुरकुटे मॅडम, शेडगे सर हेही उपस्थित होते. यावेळी गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
लहान-लहान असलेली मुलं आज मोठी होऊन कर्तृत्ववान झाली, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी नाव कमावलेलं पाहून आंनद झाल्याची भावना देखील गुरुजनांनी व्यक्त केली.माजी विद्यार्थी तलाठी संघटनेचे अध्यक्ष शंकर सावंत म्हणाले की, शिक्षकांनी आम्हाला उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले; त्यामुळे आम्ही आज या पदापर्यंत पोहचलो. आज ३४ वर्षांनंतर देखील या शाळेबद्दल आत्मीयता आहे. मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक ३४ वर्षांनंतर भेटले त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या, सर्वांना भेटून आनंद झाल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
याप्रसंगी माजी विद्यार्थी शंकर सावंत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व राजेंद्र केंजळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी राजेंद्र जाधव, अशोक मोरे, गोरख जाधव, चंद्रकांत साळुंखे, मोहन लकडे, शारदा साळुंखे, सुनंदा दळवी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान सर्वांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व भविष्यात एकमेकांना भेटत राहण्याचा संकल्प करून निरोप घेतला.