कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील येळगाव येथील दहावी -१९९६ च्या बॅचच्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने परिसरातील प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
जन्माला येताना प्रत्येक जण मातृऋण, पितृऋण. कुळऋण. समाजाचे ऋण, मातृभूमीचे ऋण, अशी कित्येक ऋणं घेऊनच जन्माला येतो. त्यातून याच जन्मी मुक्त व्हायचं असतं. त्यानुसार समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेच्या येळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यालयातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी केला.
तब्बल २८ वर्षानंतर शालेय मित्र एकमेकांना भेटले. यासाठी प्रताप शेवाळे यांनी सतत दोन वर्षे प्रयत्न केले.स्नेहसंमेलन साध्या पद्धतीने करुन प्रताप शेवाळे यांच्या पुढाकारातून मैत्री फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
फाउंडेशनमधील सर्वच विद्यार्थ्यांनी हलाखीच्या परिस्थितीत डोंगर कपारीतून चालत येत शिक्षण घेतलें होते त्यांनी ज्या शाळेतून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला त्याची जाणीव ठेवून फाऊंडेशन ने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आल्या.छोटीशी मदत असली तरी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, अशी त्यामागे भावना होती. मैत्री फाउंडेशनने भुरभुशी, गोटेवाडी, भरेवाडी, गणेशवाडी, माटेकरवाडी, चोरमारवाडी, मुळीकवाडी येथील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप केले.फाऊंडेशनच्या वतीने मोहन पाटील (भुरभुशी), तसेच प्रा.स्नेहलता शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. गणेशवाडी सरपंच माजी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब माने म्हणाले की ,या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुतीमय आहे यांनी लावलेल्या रोपट्याचा नक्कीच वटवृक्ष होईल.
भुरभुशीचे तानाजी पाटील म्हणाले की, या माजी विद्यार्थ्यांच्या मैत्री फाऊंडेशनचा उद्देश आणि विचारधारा याचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राला निश्चित फायदा होईल. यावेळी भुरभुशी सरपंच अंजली देऊंगळे, गोटेवाडी सरपंच डॉ.आमले यांनी मैत्री फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मण शेवाळे , अनिल जाधव ,सखाराम जाधव, भानुदास माटेकर, फाऊंडेशन सदस्य राजेंद्र पाटील, जयवंत काटेकर ,नईम इनामदार,संजय मुळीक, प्रकाश शिराळकर,प्रताप आमले, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.