सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्या कास जलवाहिनी वाढीव कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन द्वारे आज करण्यात आला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अमृत २.० योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील 6-7 प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये कास धरण जलवाहिनी कामाचाही समावेश करण्यात आला होता. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढवल्यामुळे 0.5 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे.
यावेळी आमदार शिवेंदरसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. सुरुवातीला खा. उदयनराजे भाेसले म्हणाले की, सातारा शहरासह त्रिशंकू भागाला पाणी पुरवठा कासच्या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. मात्र मूळची शहापूर, कण्हेर योजना पर्यायी ठेवायला लागतील. त्यामुळे 4.5 कोटीची विजेची बचत होणार आहे. ही याेजना 27 किलोमीटरची जलवाहिनी आहे. सुमारे 103 कोटींची कासची पाणी योजना आम्ही करणार आहोत. सर्वांच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करू शकलो यांचे समाधान आहे.
खा. उदयनराजेनंतर आ. शिवेद्रसिंहराजे म्हणाले की, ही योजना पूर्ण करण्यासाठी सातारा विकास आघाडीने विलंब केला. त्यामुळे सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाला. नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या काळात हे काम पूर्ण झाले नाही. उलट नगरसेवक माजी झाल्यानंतर हे काम पूर्ण होतंय ही दुर्दैवी गोष्ट आहे अशी टीका आ. भाेसले यांनी खा. उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीवर केली.
अतिरिक्त पाण्याचा पूरेपूर वापर व्हावा यासाठी वाढीव क्षमतेच्या जलवाहिन्या बसवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज या कामाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा पालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.