मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी ‘ही’ योजना आहे खास; सातारा जिल्हयात शासनाने केली लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये अभय योजना लागू केली असून ही योजना पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मुद्रांक शुल्क अभय योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा हा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर, दुसरा टप्पा हा १ फेब्रुवारी ते दि. ३१ मार्च २०२४ असा असणार आहे.

काही कारणास्तव पहिल्या टप्प्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर, दुसऱ्या टप्यामध्येदेखील सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतू अशा प्रकरणात लाभाचे प्रमाण कमी राहील. अभय योजनेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासास चालना मिळून सर्वसामान्य नागरिकांना नवीन घरांमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. केवळ, मुद्रांक शुल्काचा कमी भरणा केला असल्याने मानीव अभिहस्तांतरणाची (डिम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया प्रलंबित असलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण तातडीने पूर्ण होण्यास सहाय्य होणार आहे.

याशिवाय, कंपन्यांच्या पुनर्रचना किंवा एकत्रीकरण किवा विभाजनाच्या अनुषंगाने निष्पादित झालेल्या दस्तांवर देखील मुद्रांक शुल्काची सवलत लागू केल्याने अशा कंपन्यांच्या प्रलंबित राहिलेल्या पुनर्रचना किवा एकत्रिकरण किवा विभाजनाच्या प्रक्रियेला देखील चालना मिळून या कंपन्यांच्या माध्यमाने राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

अभय योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत नागरीकांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी संबंधित जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाचा कॉल सेंटर क्र. ८८८८००७७७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.