कराड प्रतिनिधी | रत्नागिरीत होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बसेस रत्नागिरीला मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सर्व डेपोंमधून १४४ गाड्या रत्नागिरीला गेल्यामुळं साताऱ्यातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
सातारा जिल्ह्यातील 144 गाड्या रवाना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा रत्नागिरीत भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एसटी आगारांची आणि एसटी गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून एसटी बसेस मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार सातारा, कराड आणि फलटण या मोठ्या आगारांतून प्रत्येकी २० आणि पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, वडूज, दहिवडी आणि खंडाळा या आगारांतून प्रत्येकी १२ एसटी बसेस रत्नागिरीला रवाना झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं
तीन दिवसांसाठी १४४ एसटी बसेस रत्नागिरीला गेल्यामुळे सातारा जिल्ह्यातील एसटी सेवेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक गावांच्या फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोकरदार, ज्येष्ठ नागरीक आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवाशांना खासगी वडापचाच पर्याय
तीन दिवस एसटीच्या फेऱ्या बंद राहणार असल्याने वयोवृध्द प्रवाशी आणि पासधारक विद्यार्थ्यांना वडापचाच आधार घ्यावा लागणार आहे. मंगळवारी दुपारपासून अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बसस्थानकांवर अनेक प्रवाशी ताटकळून गेले. जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. गाड्या रद्द झाल्याचे कळताच प्रवाशांनी खासगी वडापचा आधार घेत घर गाठलं.