सातारा प्रतिनिधी | विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेसमोर नऊ दिवसांपासून ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण (भाभी) या आंदोलनस्थळी आल्या होत्या. संघटनेच्या राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्या शासकीय अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. सलाईन इथे घेऊन या, तातडीने जा, अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
जिल्हा परिषदेसमोर गेल्या नऊ दिवसांपासून ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय आहे. संगणक परिचालक संघटनेच्या राज्याध्यक्षा सुनीता आमटेंची प्रकृती खालावली आहे. मात्र, त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असे असतानाच बुधवारी सौ . सत्वशीला चव्हाण (भाभी) दुपारी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी आल्या होत्या. उपोषणकर्त्या सुनीता आमटे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आंदोलनात आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
शासकीय अधिकाऱ्यांना झापले
आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण झाले तरीही शासनदरबारी हालचाली नाहीत. दुसरीकडे संघटनेच्या राज्यध्यक्षा सुनीता आमटे प्रकृती जास्तच खालावली आहे. तरीही त्यांच्या उपचाराची कसलीही सोय नसल्याचे पाहून सत्वशीला भाभींनी शासकीय अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळीच झापले. आताच्या आता इथे सलाईन घेऊन या, अशा सक्त भाषेत सूचना केली. त्यानंतर सुनीता आमटे यांना सलाईन लावण्यात आली.
‘या’ मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण
यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन (२२ हजार ६००) देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा, कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.