कराड प्रतिनिधी । भारताची प्रतिष्ठा परदेशात भारतीय संविधानामुळे आहे. अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण आजही करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृति देशात रुजवणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण यांनी केले.
कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, संविधान वाचन कार्यक्रम आयोजित केलेले योगेश लादे, अशोकराव पाटील, विद्या मोरे, सुरेश पाटील, राहुल भोसले, साहेबराव शेवाळे, अशोक सूर्यवंशी, जावेद शेख, सुनील बरीदे, प्रशांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी हर घर संविधान हे अभियान राबविणाऱ्या दै. ‘तिरंगा रक्षक’ चे संपादक विश्वास मोहिते यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्वशीला चव्हाण म्हणाल्या कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला संविधान निर्माते, समाजसुधारक म्हणून असे कंगोरे असले तरी त्यांचे व्याक्तिमत्त्व शिक्षणामुळे अधिक प्रगल्भ झाले होते. त्यांचे शिक्षणविषयक विचार आज आपण आत्मसात करायला हवे. ज्या घटनेत आपण जनतेसाठी जनतेचे व जनतेने चालविलेल्या राज्याचे तत्व अंतर्भूत केले ती घटना दीर्घकाळ टिकावी अशी इच्छा असेल तर आपल्यासमोर जी संकटे वाढवून ठेवलेली आहेत ते समजून घेण्यास आपण विलंब लावता कामा नये, त्याचे निरकरण करण्यास असमर्थ राहता कामा नये, देशाची सेवा करण्याचा हाच मार्ग आहे.
देशातील एकता एकात्मता अंखड राहण्यासाठी सदैव सजगता दाखविली पाहिजे. प्रजासत्ताक दिनानिमित्त समयोचित कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सौ. सत्वशील चव्हाण यांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच त्या म्हणाल्या राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले.