सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. अत्यंत आकर्षक असलेले सातारान्सिस हे फूल मे महिन्यात पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारीतुऱ्याचे दर्शन झाले होते. सातारीतुरा फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हणूनही ओळखले जाते.
अतिशय दुर्मीळ अशा प्रकारच्या वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो. त्यावर येणारे पान हे लांब व जाडसर आकाराचे असते. भाल्यासारखे दिसते. पानामध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असते. दोन ते तीन पानांच्या बेचक्यातून लांब व जाडसर अशा दांड्यात इंग्रजी ‘वाय’ आकाराचा तुरा येतो. म्हणून यास वायतुरा म्हणतात.
हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच सड्यावर आढळते. म्हणून यास सातारीतुरा म्हणतात. सातारीतुरा वनस्पती कास पठार व परिसरातील जैवविविधतेचे भूषण ओळखले जाते. दरम्यान सातारीतुरा वनस्पतीचे दर्शनाने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.