सातारा प्रतिनिधी | शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पुरस्कार देण्यात येत होता. आता त्यामध्ये बदल करुन सेंद्रीय शेतीमध्ये फळे, पिके, फुले, दुग्ध यामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून त्यामध्ये अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्काराने सन्मानित केले जाते. सातारा जिल्हा परिषदेच्यामार्फत १९९९ ते २००० पासून सेंद्रीय शेतीमध्ये उल्लेखनिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची व्याप्ती वाढवण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभा दि. २९ जानेवारी २०२४ मधील ठराव क्रमांक ७१७ अन्वये जिल्हा परिषदेमार्फत सेंद्रीय शेती, फळपिके, फुलशेती तसेच दुग्धोत्पादन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून
विविध कृषी पुरस्कार सुरु करण्यास मान्यता दिली होती. त्यास अनुसरुन दि. २४ जुलैच्या ठराव समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली सभेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी डॉ. जे. के. बसू सेंद्रीय शेती पुरस्कार, फळपिकासाठी कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार, फुलशेतीसाठी कै. यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन शेती पुरस्कार तर दुग्धोत्पादनासाठी कै. यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन शेती पुरस्कार या चार पुरस्कारासाठी पंचायत समित्यांमार्फत शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागवले जाणार असून गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत या पुरस्काराच्या शेतकऱ्यांचे प्रक्षेत्रातील कामकाजाची पाहणी करुन गुण दिले जाणार आहेत.
जिल्हा परिषदस्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत देखील संबंधित पुरस्कारांच्या शेतकऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली जाणार आहे. पुरस्कारासाठी सादर झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव तालुका व जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या गुणांच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.