Satara Tourism : पावसाळ्यात पिकनिक काढताय? जिल्ह्यातील ‘या’ 5 पर्यंटनस्थळांना नक्की भेट द्या !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात (Satara Tourism) अनेक पर्यंटनस्थळे आहेत. मे महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. गेल्या दहा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पर्यटनस्थळी ओसाड डोंगरावर हिरवा शालू पांघरला आहे. हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यात काहीजण पर्यटनाचा आनंद लुटत पिकनिकचे नियोजन करत आहेत. त्यांना सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात फिरण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी पर्यटनस्थळे आहेत. हुंबरळी (पाटण), तापोळा, कास, सज्जनगड/ठोसेघर आणि टेबललॅँड/पाचगणी हि पाच उत्तम अशी पर्यटनस्थळे आहेत कि तिथे तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो.

पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू. या पावसाची मजा लुटण्यासाठी अनेकजण विकेंडला घराबाहेर पडतात अन् आपल्या आवडीच्या स्थळांना भेटी देतात. सातारा जिल्ह्यातही काही भागात पाऊस कोसळत असून ओसाड डोंगडोंरांवर हळूहळू हिरवा शालू पांघरू लागला आहे. पहाटेच्या वेळी सर्वत्र धुक्याची दुलई पसरू लागली आहे. पावसाच्या सरी धबधबे कोसळण्याची चाहूल देऊ लागल्या आहेत. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहे.

Tapola

तापोळा (Tapola)

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वसलेल्या तापोळा (Tapola) या गावाला मिनी काश्मिर म्हणून ओळखले जाते. तापोळ्याला जाण्यासाठी प्रथम महाबळेश्वरला यावे लागते. या ठिकाणाहून २८ किलोमीटर अंतरावर असलेलं तापोळा हे गाव कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. याठिकाणी स्वत:च्या कारने जाता येते. तसेच एसटी बसेसची व्यवस्थाही आहे. धुक्याच्या दुलईत आपल्याला या ठिकाणी नौकाविहाराचा आनंद लुटता येतो.

Humbarli

हुंबरळी (पाटण) (Humbarli)

जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगरपासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर हुंबरळी (Humbarli) हे एका उंच टेकाडावर वसलेलं गाव. या ठिकाणाहून आपल्याला हिरव्यागार वनराईत लपलेल्या कोयना जलाशयाचे विहंगमय दृश्य दिसते. सध्या या ठिकाणी जंगल सफारी बरोबरच कोयना जलाशयात नौकाविहाराचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. या ठिकाणी राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह (एमटीडीसी) काही खासगी रिसॉटही आहे. हुंबरळीला जाण्यासाठी सातारा किंवा कराड येथून पाटणला यावे लागते. यानंतर पाटणपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना या गावी यावे लागते. कोयनेपासून ३ किलोमीटर अंतरावर हुंबरळी हे गाव आहे.

Thoseghar

ठोसेघर (Toseghar Waterfall)

पावसाळा सुरु झाली की दरवर्षी विविध धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा (Toseghar Waterfall) आहे. निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना स्वच्छंदीपणे मनमोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करण्याचे ठिकाण म्हणजेच “ठोसेघरचा धबधबा”. ठोसेघर धबधबा तारळी नदीवर आहे. जवळपास 150 ते 180 मीटर उंचीवरुन वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे. या ठिकाणी 3 धबधबे आहेत. यात एक मुख्य, त्यालगतच एक छोटा आणि तिसरा धबधबा या दोन्हीपासून थोडा लांब वाहतो. ठोसेघर धबधब्याकडे जाण्याअगोदर सज्जनगड हा किल्ला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. या गडावरून अथांग पसरलेल्या उरमोडी धरणाचे मनोहारी दृश्य
नजरेस पडते.

Pachagani

टेबललॅँड/पाचगणी (Tableland/ Panchgani)

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीची देशात ओळख आहे. थंड व उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पाचगणीला आरोग्य धाम असे म्हटले जाते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना (Tableland/ Panchgani) टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. टेबललॅँड हे आशिया खंडातील सर्वात उंच पठार आहे. पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांना पुणे-बेंगलोर महामार्गावरून वाई मार्गे पाचगणीला यावे लागते. शहरापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर हे पठार आहे. पुण्यापासून अवघ्या १०० किलोमीटर अंतराव पाचगणी हे शहर वसले आहे. या ठिकाणी घोडागाडीतून पठाराची सैरही करता येते.

Kas Plateau 0

कास (Kas Plateau)

सातारा शहराच्या पश्चिमेकडे २२ किलोमीटर अंतरावर कास हे पठार (Kas Plateau) आहे. या पठारावरील कास तलाव पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. जैवविविधतेने नटलेल्या या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात विविध प्रकारची फुले उमलून निर्सगाची उधळण करतात. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. सोसाट्याचा वारा अन् अवतीभोवती फिरणाऱ्या गर्द धुक्यातून वाट काढत पुढे जाण्याचा थरार येथे अनुभवण्यास मिळतो. कास मार्गावर राहण्यासाठी हॉटेल व जेवणाचीही उत्तम व्यवस्था देखील आहे.