सातारा प्रतिनिधी | सातारा हे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे येथे ये-जा असलेल्या हजारो प्रवाशांसाठी बसस्थानक एक महत्त्वाचा वाहतुकीचा केंद्रबिंदू ठरतो. सातार्याचे बसस्थानक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांशी तसेच आसपासच्या तालुक्यांशी संपर्क साधण्याचे मुख्य साधन आहे. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून सातार्याचे प्रमुख बसस्थानक हे केवळ प्रवास केंद्र न राहता सातार्याच्या गौरवशाली इतिहासाला साजेसं ठिकाण ठरणार आहे. सातार्याचे बसस्थानक एअरपोर्टसद़ृश तयार केले जाणार असून त्याची ऐतिहासिक शैलीने रचना करण्यात येणार आहे.
सातार्याचे बसस्थानक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांशी तसेच आसपासच्या तालुक्यांशी संपर्क साधण्याचे मुख्य साधन आहे. सातार्यात अनेक शैक्षणिक संस्था, प्रशासकीय कार्यालये व न्यायालये असल्याने विद्यार्थ्यांसह, अधिकारी, कर्मचारी यांच्या दैनंदिन प्रवासासाठी सातारा बसस्थानक महत्त्वाचे ठरते. सातारा जिल्ह्यासह शहर परिसरात अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, महाबळेश्वर, पाचगणी ही महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे पर्यटन प्रवाशांसाठी हे बसस्थानक प्रवेशद्वाराचेच काम करते. व्यापारी, शेतकरी, विक्रेते यांच्यासाठी बससेवा ही जीवनरेषा आहे. वस्तूंची व लोकांची वाहतूक सुलभ होते. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.
सातार्याहून महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर अशी प्रमुख शहरे तसेच शेजारील राज्यांमध्येही बससेवा उपलब्ध असल्याने शहराची उंची वाढली आहे. सातारा बसस्थानकातून दररोज शेकडो एसटी बसेसमधून हजारो प्रवासी प्रवास करत असतात. सातारा मध्यवर्ती बसस्थानकाची पर्यावरणपूरक रचना असेल. सौरऊर्जेचा वापर, पावसाचे पाणी संकलन व जलपुनर्वापर, कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. उत्तम वायूविजन राहिल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे बसस्थानक पर्यावरणपूरकतेचा आदर्शही निर्माण करणार आहे.