सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांना ‘ई-पॉज’ यंत्र उपयोगात आणण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर उपाययोजना काढण्यासाठी सर्वच ‘ई-पॉज’ यंत्रे तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडे जमा करण्यात आली. याविषयी सातारा तालुका रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन अनुमतीधारक संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गत १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ‘सर्व्हर’ची समस्या भेडसावत आहे. यंत्राला रेंज नसल्यामुळे अन्नधान्याचे वाटप पूर्णतः बंद पडले आहे. त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद होत आहेत. यामुळे ग्राहकांना अन्न-धान्य पुरवठा करणे अशक्य झाले आहे. जुलै आणि ऑगस्टचे धान्य एकाच पावतीवर अन् एकच अंगठा घेऊन देण्यात यावे.
यामध्ये गणेशोत्सवा निमित्त देण्यात येणार्या ‘आनंदाचा शिधा’ याचाही समावेश व्हावा. अनेक वेळा दुकानदारांना गोदामातून येणारी धान्याची पोती मोठ्या प्रमाणात फाटलेली असतात. त्यामुळे धान्याचीही नासाडी होते. ही पोती जागेवर शिवून मिळावीत. कार्डधारकांची ‘ई-केवायसी’ नोंदणी करतांना माणशी ५० रुपये याप्रमाणे भत्ता मिळावा. राज्य संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार सर्व व्यवस्था पूर्ववत् होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदार शासनाकडे तात्पुरत्या स्वरूपात यंत्र जमा करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.