सातारा प्रतिनिधी | शाळा, महाविद्यालय तसेच नोकरीसाठी आवश्यक असणारे दाखले काढताना विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जुलै अखेरपर्यंत शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी सातारा सेतू कार्यालय सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी कर्मचार्यांना त्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शाळा तसेच महाविद्यालयात तातडीने दाखले जमा करावे लागतात. त्यामुळे महसूल विभागाने गर्दीचा विचार करून तातडीने दाखले द्यावेत, संगणक प्रणालीतील अडचणी, सतत खंडित होणारा वीजपुरवठा, विविध प्रकारच्या दाखल्यांची वाढलेली मागणी यामुळे दाखल्यांसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना सूचना केल्या आहेत.
दाखल्यांची वाढती मागणी, विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये ही बाब लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संवाद साधला. शनिवार व रविवारी तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सेतू विभाग सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत शैक्षणिक दाखल्यांची मागणी आणि जे दाखले तयार होतील ते तातडीने नागरिकांना देण्याची सूचना तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केली.
32 हजार दाखल्यांचे वितरण
शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर शैक्षणिक दाखल्यांच्या मागणीसाठी पालकांची गर्दी वाढत आहे. विविध अडचणींवर मात करून सेतूमधून जानेवारी 2024 ते 26 जून 2024 अखेर 32 हजार 923 दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे.