निवडीच्या वाहन क्रमांकामधून RTO विभागाने कमविला कोटीचा महसूल; 1 क्रमांकासाठी तब्बल 9 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आपल्या वाहनाच्या नंबरप्लेटकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा बर्‍याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा चॉईस नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे वाहनांना आकर्षक नंबर घेण्याचे फॅड सातारा जिल्ह्यात चांगले वाढले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचा फायदा घेत निवडीच्या नंबरच्या माध्यमातून सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला 6 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. सगळ्यात 1 क्रमांकाने सर्वाधिक भाव खाल्ला असून या क्रमांकासाठी वाहनधारकाने तब्बल 9 लाख रुपये मोजले आहेत.

आकर्षक क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुल्क निर्धारीत केले आहे. त्यानुसार ज्या वाहनधारकांना आवडीचे व आकर्षक तसेच शुभअंक वाहनाच्या क्रमांकात पाहिजे असतात. त्यासाठी काही वाहनधारकांनी हवा तोच क्रमांक मिळवण्यासाठी क्रमांकाच्या लिलावात सहभाग घेतला होता. या लिलावातही वाहनधारकांनी मागेपुढे न पाहता आकर्षक क्रमांकासाठी लाखो रुपये भरुन हे वाहन क्रमांक मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

गेल्या वर्षभरात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे आकर्षक क्रमांकासाठी 8 हजार 82 वाहनधारकांनी नोंदणी केली होती. या आकर्षक क्रमांकातून आरटीओला 6 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. सातार्‍यातील नागरिकांनी आपल्या वाहनाच्या पसंतीच्या क्रमांकासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यातून आरटीओच्या तिजोरीत चांगल्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे.