सातारा प्रतिनिधी । दोन घरफोड्या व दोन दुचाकी चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) वतीने एका सराईत चोरट्यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून चोरीतील सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महेश शिवाजी बाबर (वय 48, रा. किकली ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर परिसरात घरफोड्या व दुचाकी चोरीचे प्रमाण वाढू लागले होते. शहर पोलिसांचे डीबीचे पोलिस पथक घरफोडीतील सराईत आरोपीची माहिती घेत होते. त्यावेळी एक सराईत आरोपी चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन सातार्यात सापळा लावला. संशयिताला पोलिसांनी पकडल्यानंतर प्राथमिक चौकशी केली असता त्याने चोर्यांची कबुली दिली. सातारा शहरामध्ये दोन ठिकाणी घरफोडी व दोन ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे चोरीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याने पहाटेच्या सुमारास सातारा येथील विलासपूर येथून लॅपटॉप, आयफोन, पॉवर बँक व इतर साहित्य चोरी केले होते. तसेच शाहूपुरी हद्दीतील एक बंद बंगल्याचे कुलूप तोडून तेथून मोटारसायकल, चारचाकी वाहनाची चावी असे चोरी केली असल्याची कबुली दिली. चोरट्याने चोरीची कबुली दिल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी दोन दुचाकीसह चोरीस गेलेला 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीवर यापूर्वी एकूण 23 घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाई प्रकारणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोनि (क्राईम) दादाभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्याम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, मोघा मेचकर, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, सुहास कदम, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.