सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा एलसीबी आणि सातारा ग्रामीण पोलिसांनी ७२ तासात उघडकीस आणत तिघांना अटक केली आहे. भाजपचा प्रचार करतोस काय?, तुला लय मस्ती आली आहे काय?, असे म्हणत सरबत विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, कोयत्याने मारहाण करत त्याचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी रजत राजेंद्र निंबाळकर, प्रवीण दत्तात्रय शेलार आणि सुजित नामदेव मोरे (सर्व रा. राजाळे, ता. फलटण) या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुन्हयात वापरलेला लोखंडी रॉड, चटनी पुड, वाहन तसेच चोरून नेलेला ५००० रुपये किंमतीचा मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला आहे. गोवे (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीत कोटेश्वर पुलाजवळ फिर्यादी हे सरबत व बर्फगोळा विक्री करीत असताना काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी फिर्यादीच्या डोळयात चटणी पुड टाकली. तू भाजपचा प्रचार करतोस काय, तुला लय मस्ती आली आहे काय, असे म्हणत फिर्यादीला लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जबरदस्तीने मोबाईल चोरुन पलायन केले होते. याप्रकरणी सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
राजकियदृष्ट्या गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यानी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशित केले होते. तपास पथकाने घटनास्थळाची पहाणी करून आजुबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली. गोपनिय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे तीन संशयितांची नावे समोर आली. संशयित राहत असलेल्या ठिकाणी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार दोन लोखंडी रॉड, टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल चोरून नेलेला मोबाईल हस्तगत केला.