बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी ओगलेवाडीच्या सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एका प्रकरणात फसवणूक करून तो गेल्या पाच वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन पेहराव करून बंगळूरमध्ये राहत होता. इकडे सातारा पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना त्यांना ‘त्याच्या’बाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथक साताऱ्यातून थेट बंगळुरमध्ये दाखल झाले आणि सिनेस्टाइलने बंगळुरात ट्रॅफिक जाम करून त्यांनी सराईत अशा गुन्हेगारास अटक केली. फसवणूक प्रकरणी सातारा पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली.

विनायक शंकर रामुगडे (वय ४४, रा. ओगलेवाडी, ता.कराड), कलावती ऊर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण (४३, मूळ रा. कोरेगाव, सध्या रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) तसेच या दोघांना मदत करणाऱ्या अनुजा मंगेश जाधव (२६, रा. चंदननगर, कोडोली), कुणाला अमर भांडे (२४, रा. शाहूनगर, गोडोली, सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी करण्यात आली असून तेथील वाईन शाॅप, देशी दारूचे लायसन्स हे मंत्रालयातील अधिकारी यांच्या ओळखीने इतर ठिकाणी ट्रान्सफर करून देतो, असे सांगून कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील विनायक रामुगडे याने प्रिया चव्हाण हिच्या मदतीने साताऱ्यातील एका व्यावसायिकाला ७५ लाखांचा गंडा घातला होता. इतकेच नाही तर त्याने कोरेगाव, पुणे, मुंबईसह परराज्यांतही अशाच पद्धतीने या बंटी-बबलीने अनेकांना कोटी रुपयांना फसविल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाकडून संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो कधी हैदराबाद, आंध्र प्रदेश तर कधी बंगळुरू येथे वेषांतर करून वावरत होता.

त्याच्या शोधासाठी पोलिसांनी रात्रीचा दिवस केला आणि अखेर तो बंगळूरमध्ये असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अविनाश गवळी, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी यांचे पथक बंगळुरूला गेले. तेथे रामुगडे याचा पोलिसांनी चार दिवस कसून शोध घेतला. तेव्हा तो कारने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ प्लॅन तयार करून एका ठिकाणी महामार्गावर ट्रॅफिक जाम केले. त्याच्या वाहनाच्या मागे व पुढे पोलिसांनी खासगी वाहने लावून अखेर त्याला पकडून ताब्यात घेतले.

त्याला साताऱ्यात घेऊन आल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली. त्यावेळी त्याच्यासोबत काम करणारी प्रिया चव्हाण ही पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले. एका पथकाने पुण्यात जाऊन प्रिया चव्हाण हिला अटक केली. या बंटी-
बबलीला मदत करणारे अनुजा जाधव आणि कुणाला भांडे या दोघांनाही पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली.या कारवाई प्रकरणी पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी डीबी पथकाचे काैतुक केले आहे.