‘पैशांचा पाऊस पडतो’ म्हणत घातला 36 लाखांना गंडा; पोलिसांनी ठोकल्या काका महाराजाला बेड्या!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । “मी पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगून एकाला ३६ लाखांना गंडा घालणाऱ्या एका काका महाराजाला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने बुधवारी अटक केली.

पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज (वय ५४, रा. कापडे भवाणवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या भोंदू महाराजाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमित श्रीरंग शिंदे (वय ४२, रा. नाडे, ता. पाटण, सध्या रा. रविवार पेठ, सातारा) यांची तीन वर्षांपूर्वी काका महाराज याच्याशी ओळख झाली. त्यावेळी काका महाराज याने शिंदे यांना पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देतो. तसेच वीज पडलेल्या भांड्यावर अघोरी पूजा जादूटोणा चमत्कार करून त्याच्या विक्रीतूनही तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगितले.

यानंतर शिंदे यांनी स्वत:कडचे काही पैसे तसेच इतर ओळखीच्या पाचजणांचे पैसे, असे मिळून तब्बल ३६ लाख रुपये काका महाराजला कधी रोख तर कधी ऑनलाइन पाठवले. हे पैसे दिल्यानंतर करोडे रुपये मिळतील, अशी आशा शिंदे यांच्यासह इतरांना होती. काका महाराज याने त्यांचा विश्वास बसवा म्हणून हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे टोळक्यांकडे नेले. त्या ठिकाणी त्या टोळक्याने प्रात्यक्षिक करून दाखविले. मात्र, पैशाचा पाऊस काही पडला नाही. हा प्रकार सप्टेंबर २०२१ला घडला. या प्रकारानंतर शिंदे यांच्या ओळखीने ज्यांनी पैसे यात गुंतवले होते. ते लोक शिंदे यांना पैसे मागू लागले.

या प्रकारानंतर शिंदे यांनी २५ जून २०२४ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर माेरे, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी यांचे पथक रायगड जिल्ह्यामध्ये गेले. तेथे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता पोलादपूर येथे काका महाराज असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन काका महाराज याला अटक केली.