सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यात एका हॉटेल व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी 15 जणांच्या टोळीने मागितली होती. या प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी 15 जणांपैकी 11 जणांना अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 जून 2023 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मेणवली (ता. वाई जि. सातारा) येथील एका हॉटेल व्यवसायिकाला 15 जणांच्या टोळीने पिस्तुल रोखून त्याचेकडे 10 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली व त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या गळयातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढून चोरी केली. त्यास धक्काबुक्की व मारहाणही केली होती. गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक अजय कोकाटे यांना दिल्या.
भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संतोष पवार, सहायक निरीक्षक रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, फौजदार अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला असता त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार १) अनिकेत ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईज ता. वाई जि. सातारा), २) निखिल शिवाजी मोरे रा. गंगापूरी, (वाई ता. वाई जि. सातारा), ३) अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापूरी, वाई ता. वाई जि. सातारा), ४) आरिफ सिकंदर मुल्ला (वय ४३ , रा. भुईंज ता. वाई),
५) सागर तुकाराम मोरे (वय ३४, रा. भुईज ता. वाई), ६) अभिमन्यू शामराव निंबाळकर (वय २५,रा. भुईंज ता. वाई), ७) सुरज मुन्न शेख (वय २१, रा. भुईंज ता. वाई), ८) संदिप सुरेश पवार (वय २३, रा. भुईंज ता. वाई), ९) क्षितीज ऊर्फ सोन्या विरसेन जाधव (वय १९,रा. भुईंज ता. वाई,) १०) गिरिश दिलीप गवळी (वय २५, रा. भुईंज ता. वाई), ११) प्रज्वल बाळकृष्ण पवार (वय २३, रा. भुईज, ता.वाई), १२) प्रतिक प्रकाश सुर्यवंशी (वय २८, रा. भुईंज ता. वाई), १३) अमोल महामुलकर (रा. महामुलकरवाडी, भुईंज ता. वाई), १४) रत्नाकर मधूकर क्षीरसागर (वय २८, रा. भुईंज ता. वाई), १५) निलेश उमेश मोरे (वय २५, रा. भुईंज ता. वाई) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यातील ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तपास पथकांनी सर्वप्रथम घटनेच्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करुन, चौकशी करून, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर तांत्रिक तपासाचा आधार घेऊन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. गुन्हयाचा पुढील तपास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे करीत आहेत.