सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर उत्तम कामगिरी केली आहे. सातार्याच्या आदिती स्वामीने नुकतेच 17 व्या वर्षी जागतिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत यशाला गवसणी घातली आहे. तिच्याप्रमाणेच क्रीडा क्षेत्रात भारतीय हॉकी संघातून एका ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड आई-वडिलांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. काजलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय ज्युनिअर हॉकी संघात स्थान मिळवल आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार देशांच्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.
सातारा जिल्ह्यामधील माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर दाम्पत्यांच्या पोटी जन्मलेल्या काजल हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा पाण्यापासून वंचित असलेला. त्यामुळे अभ्यास करणं आणि पुढे सरकनं हेच एकमेव ध्येय ठेऊन या भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यात ललीता बाबरसारख्या खेळाडूंमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना प्रोत्साहन मिळत गेले. माण खटाव फलटण भागातील अनेक विद्यार्थी हे खेळांच्या स्पर्धेसाठी मोठी कसरत करताना पाहायला मिळत आहेत.
दगड धोंड्यांमधून पळणारी ललीता बाबर सरावामुळे यशाच्या शिखरावर पोहोचली. तसेच स्वप्न बाळगणारी काजल आटपाडकर हीने देखील साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. खेचरावरचे बिऱ्हाड घेऊन ऊस तोडीसाठी गावोगावी जाणाऱ्या कुटुंबातील काजलनं आज कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नकळत्या वयातच शिक्षकांनी तिच्यातली चुनुक ओळखली आणि आई वडिलांना समजावले. तिला स्पोर्टस बरोबर शाळेला बाहेरच्या जिल्ह्यात टाकले. कुटुंबाला याचा आर्थिक त्रास सहन करावा लागला आणि याची जाण काजलने ठेवली.
आयर्लंडमधील स्पर्धेत भारताला रौप्य पदक
सातारा जिल्ह्यातील काजलने भारताच्या हॉकी संघाच्या सराव शिबिरात सहभाग घेतला. त्यानंतर तिने भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयर्लंड येथील स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून देण्यात तिने निर्णयात्मक भुमिका बजावली आहे. तसेच झारखंड येथील सिमडेगा येथे झालेल्या 11 व्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील उल्लेखनीय कामगिरीबद्दाल राज्य शासनातर्फे तिला 50 हजाराचे बक्षीसही मिळाले होते.
सातारा जिल्ह्यातील ऊसतोड मजुराची लेक काजलने मिळवलेल्या यशामागचे श्रेय खऱ्या अर्थाने तिच्या शिक्षकांबरोबर आई-वडिलांचेही आहे. जे आईवडील ऊसतोड कामगार म्हणून सहा सहा महिने गावोगावी फिरून पालावर राहतात. तर राहिलेले सहा महिने गावाकडे येऊन मिळेल तेथे मजुरी करतात. मजुरी करुन कुटुंब चालवणारे नकुसा आटपाडकर आणि सदाशिव आटपाडकर यांची मुलगी काजलने अटकेपार झेंडा फडकावून भारताचे नाव रोशन करण्यासाठी ती जिद्दीने हॉकी स्पर्धेत उतरली आहे.