सातारा प्रतिनिधी । एखादा शासकीय कार्यालयातील अधिकारी किव्हा कर्मचारी म्हंटलं की त्यांच्या मागेपुढे करण्याबरोबरच कागद टेबलावरून हलविण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात.कामे झटपट आणि गुपचूप करून घेण्यासाठी काहीजण पैशांचीही ऑफर पुढे करतात. कारण ‘साहेब काही मिळणाऱ्या पगारात खुश नसतील, असं त्यांना वाटत असते. मात्र, सातारा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या सतीश बुद्धे यांनी चक्क आपल्या कक्षाबाहेर ‘मी माझ्या पगारात समाधानी आहे’ हा फलक लावला आहे. विविध कामांच्या निमित्ताने पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांचेच लक्ष हा फलक वेधून घेत आहे. सध्या या त्यांच्या फलकांची जिल्हाभर चांगलीच चर्चा सुरु आहे.
सातारा पंचायत समितीत येथे गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या सतीश बुद्धे यांनी जावळी पंचायत समितीत यशस्वी काम केले. शासकीय कार्यालयांमध्ये नवीन अधिकारी रूजु झाला की ‘नवा गडी नवे राज्य’ ही कामाची पध्दत रूढ आहे. सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर
अवघ्या काही दिवसांतच बुद्धे यांनी फलकामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सातारा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी बुद्धे यांनी लावलेला हा फलक राजकीय पदाचा धाक दाखवुन सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या मर्जीतले काम करण्याची कंत्राटी पध्दती बंद होण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आपल्या नावाखाली कोणीही गैरप्रकार करू नये असा स्पष्ट निरोपही बुद्धे यांनी याद्वारे दिला आहे.
नेमकं काय लिहलं आहे फलकावर…
सातारा पंचायत समितीत नव्याने रूजु झालेले गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी आपल्या दालनाबाहेर एक बोर्ड लावला आहे. लक्षवेधक ठरलेल्या या बोर्डावर ठळकपणे मजकुर लिहीला आहे. यात ‘मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर निवेदने, तक्रारी, लेखी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हाॅटस अॅप मेसेज नाव व गावाच्या उल्लेखासह) करावा’ असे नमुद करण्यात आले आहे.