Satara News : भरधाव क्रुझर गाडी रस्त्याकडेच्या विहिरीत बुडाली; कराड चिपळूण रस्त्यावर मोठा अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण महामार्गावरील विहे (ता. पाटण) गावच्या हद्दीतील विहिरीत भरधाव क्रूझर गाडी कोसळून भीषण अपघात झाला आहे. संपूर्ण गाडी विहिरीत बुडाली असून सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री ८ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडकडून मल्हारपेठकडे निघालेली भरधाव क्रूझर गाडी (MH-11 A 6261) अचानक रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी जास्त असल्याने संपूर्ण गाडी पाण्यात बुडाली. गाडीचे भाडे रद्द झाल्याने कराडहून परत मल्हारपेठला जात असताना गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली.

गाडी रिकामी?

रात्री उशीरपर्यंत विहिरीमध्ये शोधकार्य सुरु होते. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने क्रुझर गाडी २०-३० फूट खोल बुडाली होती. अखेर रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रशासनाला गडाच्या बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र गाडी बाहेर काढल्यानंतर गाडीत कोणीही आढळलेले नाही. त्यामुळे आता तुडुंब भरलेल्या विहिरीत शोध घेण्यात येणार आहे.

अपघातात चालकाचा मृत्यू?

रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या शोधकार्यात क्रुझर गाडी बाहेर काढण्यात आली असून प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. अपघातावेळी गाडीमध्ये केवळ चालक होता असे समजत आहे. बॉडी गाळात अडकल्याने शोध घेण्यात येणार आहे, परंतु अंधार असल्यामुळे अडचणी येत आहेत

पोलीस क्रेनसह घटनास्थळी दाखल

या अपघाताची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीत कोसळलेली गाडी मल्हारपेठमधील असल्याचे समजते.