Satara News | साताऱ्यातील कारंडवाडीत मोठी दुर्घटना घडली आहे. शेतातून घरी परत येताना ट्रॅक्टर ट्राॅली कण्हेर उजव्या कालव्यात कोसळून एकाच गावातील चार महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर पाण्यात बुडालेल्या दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
कारंडवाडी गावावर शोककळा
कारंडवाडी गावातील चार महिलांच्या अपघाती मृत्युने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (५५), अरुणा शंकर साळुंखे (५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (६५, सर्व रा.कारंडवाडी, ता. सातारा) या महिलांचा कॅनालमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अन्य दोन महिलांवर उपचार सुरू आहेत.
ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली कालव्यात
साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या कारंडवाडी गावातील सात-आठ महिला शेतात गेल्या होत्या. सायंकाळी अचानक पाऊस आल्याने सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घरी यायला निघाल्या. कारंडवाडी-देगाव रस्त्यावरील कॅनाॅलशेजारून ट्रॅक्टर येत असताना एका वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळली. या दुर्घटनेत चार महिलांचा बुडून मृत्यू झाला.
दोन महिला बचावल्या
या दुर्घटनेत दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनाॅलमधून बाहेर काढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच गावातील चार महिला बुडाल्याचे समजताच कारंडवाडीतील नागरिक, महिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. चारही महिलांचे मृतदेह कॅनाॅलमधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.