Satara News | खरीप हंगाम 2023 च्या पार्श्वभूमीवर अप्रमाणित बियाणे, खते, किटकनाशके विक्री करणाऱ्या 14 कृषि सेवा केंद्रांवर कृषि विभागाने कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये 3 बियाणे विक्रेते, 9 खत विक्रेते, व 2 किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. तसेच 2 खत विक्रेते व 1 किटकनाशक विक्रेते यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी कळविले आहे.
जिल्हयात 12 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. कृषि निविष्ठांची जादा दराने विक्री, अप्रमाणित कृषि निविष्ठांची विक्री करणे इत्यादी प्रकार आढळून आल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर कठोर कायदेशिर कारवाई करणेत येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. पाऊस लांबला असून शेतकन्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा (4 ते 5 इंच खोल) किंवा 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात
जिल्हयामध्ये खरीप हंगाम 2023 च्या अनुषंगाने रासानिक खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. त्यामध्ये युरिया 16 हजार 764 मे. टन, डी. ए. पी. 10 हजार 287 मे. टन, म्युरेट ऑफ पोटॅश 926 मे. टन, सुपर फॉस्फेट 9 हजार 375 मे. टन तसेच इतर संयुक्त खते 25 हजार 927 मे. टन या प्रमाणात उपलब्ध आहेत. बियाणांचा पुरवठा ही योग्य प्रमाणात झाला आहे. यामध्ये ज्वारी 685 क्विंटल. बाजरी 1 हजार 595 क्विंटल, भात 10 हजार 749 क्विंटल, सोयाबीन 14 हजार 96 क्विंटल, घेवडा 2 हजार 179 क्विंटल, मका 6 हजार 347 क्विंटल बियाणे कृषि सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Satara News
बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करताना पक्की पावती घ्या
शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करताना विक्रेत्यांकडून खरेदीची पक्की पावती घेवूनच खरेदी करावी. जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी खताची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे. खताची ऑफलाईन विक्री झाल्याचे आढळून आल्यास संबंधीत विक्री केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषि विकास अधिकारी श्री. माईनकर यांनी सांगितले.
तक्रार करण्यासाठी येथे फोन करावा
कृषि निविष्ठांच्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठांबाबत तक्रार असल्यास संबंधित तालुका तक्रार निवारण कक्ष किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा कार्यालयातील कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष, मोबाईल क्रमांक 7498921284 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागाने केले आहे.