सातारा प्रतिनिधी | उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घातले. यामध्ये मुकादम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संतोष खुडे, (वय 43 रा. ढोणे कॉलनी रामाचा गोट) हा मुकादम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
सतीश मारुती जाधव (रा. आकाशवाणी, झोपडपट्टी सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. तक्रार अर्जातील अधिक माहितीनुसार,गुरुवारी सकाळी ७:३० वाजता खुडे हे गुरुवार परज येथे कामावर हजर राहून सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होते. त्यावेळी सतीश जाधव याने तेथे येऊन माझे उसने घेतले साडेसात हजार रुपये परत दे, नाहीतर तुला बघून घेईल असा दम दिला तसेच रागाच्या भरात शिवीगाळ करत दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातातील फावडे घेऊन त्यांच्या डोक्यात जोरात हल्ला केला.
या मारहाणीमध्ये खुडे गंभीर जखमी झाले दोघांच्या झटापटीमध्ये इतर सफाई कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. जाधव रागाच्या भरात शिवीगाळ करत तेथून निघून गेला. खुडे यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उपचारानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये जाधव याच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. सातारा पोलीस अधिक तपास करत आहे.