सातारा प्रतिनिधी | पोवई नाक्यावरील टपाल कार्यालयाच्या सुशोभीकरणाला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आली. सूचना देऊनही संबंधितांनी टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या न काढल्याने पालिकेला ही कारवाई करावी लागली.
टपाल कार्यालयाने मुख्य इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शासनाकडून अडीच कोटींचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात रंगरंगोटी, संरक्षक भिंत, तसेच वाहनतळाचे काम पूर्णत्वास आले.
आहे. दुसऱ्या टप्प्यात दर्शनी भागातील संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण सुरू करण्यात आले असून, या कामाला फूटपाथवरील टपऱ्या व खाद्यपदार्थाच्या गाड्यांचा अडथळा निर्माण झाला होता. फूटपाथवरील ही अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी पोस्ट कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांना गाड्या स्वतःहून हटविण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, टपरीधारकांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने शुक्रवारी दुपारी अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून येथील दहा टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या हटविण्यात आल्या.