सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिकेने शहरातील सर्व फ्लेक्स व होर्डिंग धारकांना चोवीस तासांच्या आत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालासह अन्य दस्तऐवज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येत असल्याने संबंधित होर्डिंग, फ्लेक्स अनधिकृत समजून ते हटविले जातील. शिवाय या कारवाईसाठी येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून वसूल केला जाईल, असा इशारा पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिका प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी होर्डिंग धारकांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. सातारा पालिकेने या घटनेनंतर तातडीने शहरातील सर्व फ्लेक्स व होर्डिंगधारकांना नोटीस बजावून होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल, होर्डिंग उभारण्यासाठी दिलेले परवानगी पत्र, होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, रुंदी याची लेखी माहिती व फोटो, होर्डिंग उभारण्यात आलेल्या मिळकतीचा उतारा, करारनामा, मिळकत व जाहिरात कर भरल्याची पावती आदी दस्तऐवज पालिकेत तीन दिवसांत जमा करावा असे आदेश दिले होते.
मात्र, होर्डिंगधारकांनी मुदत संपली तरीदेखील ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने होर्डिंगधारकांना दस्तऐवज जमा करण्यासाठी चोवीस तासांची मुदत दिली आहे. यानंतर दि. २७ मे पासून अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सर्व होर्डिंग, फ्लेक्स अनधिकृत समजून ते हटविले जातील. यासाठी येणारा खर्चही होर्डिंगधारकांकडून वसूल केला जाईल, असा इशारा मुख्याधिकारी बापट यांनी दिला आहे.