सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या परवानगीविना सदर बझार, जिल्हा रुग्णालय व नुतन प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून 13 गाळे सुरु होते. या गाळ्यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून संबंधित गाळे सील करण्यात आले. तसेच गोडोली येथील एक पत्र्याचे शेडदेखील पथकाने हटवून तेथील जागा मोकळी केली.
सातारा शहर व परिसरात काही व्यावसायिकांनी पालिकेची परवानगी न घेता गाळ्यांचे बांधकाम करून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला असल्यामुळे या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारीकार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, मनसेच्या आंदोलनाची दखल घेत काल मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाईची मोहीम हाती घेतली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी शहरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली.
सातारा शहरातील जिल्हा रुग्णालय, विश्रामगृह परिसर, प्रशासकीय इमारत येथील तेरा गाळे सील करण्यात आले. यानंतर पथकाने वाहतुकीस अडथळा ठरणारे गोडोली येथील एक पत्र्याचे शेडदेखील हटविले. रामराव पवार नगर येथे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र, येथील व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढणार असल्याचे सांगून त्यासाठी मुदत मागून घेतली. त्यामुळे पथकाकडून येथील कारवाई थांबविण्यात आली. या कारवाईत भाग निरीक्षक सतीश साखरे, श्रीकांत गोडसे, प्रकाश शिर्के यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.