सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगरपालिकांनी शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातारा पालिकेनेही सहभागी होत साताऱ्यात अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा दिल्या. तर 8 दिवसात १५ होर्डिंग्ज जप्तीची कारवाई केली आहे. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा पालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईमुळे सातारा शहराला लागलेले अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगचे ग्रहण आता सुटू लागले आहे. शहर कित्येक वर्षांनंतर मोकळा श्वास घेऊ लागले आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांचे बदललेले हे रूप पाहून सातारकरांमधूनही पालिकेचे कौतुक होत आहे. सातारा शहर स्वच्छ व सुंदर आहेच; परंतु या शहरात पाऊल ठेवले की मोठ-मोठे फ्लेक्स अन् होर्डिंग नजरेस पडायचे.
सातारा पालिकेकडून ‘नो फ्लेक्स झोन’ जाहीर करूनही त्याचा फ्लेक्स व होर्डिंगधारकांवर फारसा प्रभाव झाला नव्हता. पालिकेच्या कारवाईला न जुमानता शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच इमारतींवर फ्लेक्स व होर्डिंग उभारले जात होते. अलीकडच्या दीड-दोन वर्षांत वर्षांत हे प्रमाण इतके वाढले की संपूर्ण शहर फ्लेक्स व होर्डिंगच्या आड झाकून गेले. मात्र, घाटकोपर दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीनंतर संपूर्ण राज्यातील होर्डिंग व फ्लेक्सचा विषय चर्चेचा ठरला.
सातारा जिल्हा प्रशासनानेदेखील होर्डिंगचा विषय गांभीर्याने घेत अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. सातारा पालिका प्रशासनाने आठ दिवसांपासून कारवाईस प्रारंभ केला असून, आतापर्यंत पंधराहून अधिक अनधिकृत होर्डिंग व शेकडो फ्लेक्स मुळासकट काढून टाकले आहेत. फ्लेक्स व होर्डिंगची गर्दी कमी होऊ लागल्याने या शहराचे रूपही आता हळूहळू बदलू लागले आहे.
पालिकेने ‘या’ ठिकाणचे हटविले होर्डिंग
1) कूपर कॉलनी – ०६,
2) गोडोली – ०२,
3) राजवाडा बसस्थानक – ०३,
4) नगरवाचनालय – ०३,
5) मोती चौक – ०१