सातारा पालिकेने 265 जणांना बजावली दंडात्मक कारवाईची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सातारा शहरातील तब्बल २६५ बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या नळनधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, दंड भरून नळकनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, सातारावासीयांना पाणीटंचाईबरोबरच पाणीकपातीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. दैनंदिन पाणीपुरवठ्यात कोणताही बदल न करता नागरिकांकडून पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या पथकाकडून याचा शोध घेण्यात आला.

या मोहिमेत शहरातील नळ कनेक्शनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डोंगरी भाग तसेच काही पेठांमध्ये तब्बल २६५ बोगस नळकनेक्शन आढळून आले. पालिकेने अशा नळधारकांची यादी तयार केली असून, संबंधितांना दंडाची नोटीसही बजावली आहे. दंड व निर्धारित शुल्क भरून नळकनेक्शन नियमित करण्याचे आदेश देण्यात आले असून, असे न केल्यास संबंधित नळधारकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.