सातारा प्रतिनिधी | सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली असून, या प्रकरणी नऊ ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. पावसाने उघडीप देताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून शहरातील काही मुख्य तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली. मात्र, पाऊस सुरू होताच ठिकठिकाणचे रस्ते उखडू लागले. रस्त्यावरील डांबरांचा थर निघून गेला. तर काही प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची अक्षरशः रांग लागली. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांचे आकारमान वाढत चालले असून, पालिकेत नागरिकांच्या तक्रारींचा ओघही वाढला आहे.
या गोष्टीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी गांभिर्याने दखल घेत रस्त्यांची पाहणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या. या पाहणीत कामांत दोष आढळून आल्याने त्याबाबतचा अहवाल बांधकाम विभागाने तयार केला असून, यानुसार मुख्याधिकारी बापट यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित नऊ ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. दुरवस्था झालेले रस्ते पाऊस थांबल्यानंतर पूर्ववत करून देण्याचे आदेश नोटिसीद्वारे. देण्यात आले आहेत.